पुणे ( Babasaheb Purandare ) – आपले अवघे आयुष्य शिवछत्रपतीचा पराक्रम मांडण्यात आणि तो सामन्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात व्यतीत करणारे समर्पित जीवनव्रती शिवशाहीर आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब उपाख्य बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचे आज निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. त्यांना 2019 मध्ये पद्मविभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून न्युमोनियामुळे त्यांना दिनानाथ रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. त्यांच्यामागे, मुलगी आणि दोन पूत्र असा परिवार आहे. आपले आयुष्य गडकोट आणि इतिहासाच्या पानांमध्ये त्यांनी गुंतवून घेतले होते. राज्यातील प्रत्येक गडकोटाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी संशोधन आणि शाहीरीसाठी त्यांनी अनेकदा भटकंती केली होती.
शिवसेनेच्या स्थापनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माधवराव देशपांडे, माधवराव म्हेत्रे यांच्यासह त्यांनी 70 दशकामध्ये सहभाग घेतला. ते महत्वाच्या नेत्यांमधील असूनही शिवरायांच्या प्रचार कार्यात झोकून देण्याच्या आयुष्य ध्येयामुळे त्यांनी त्यानंतर शिवचरीत्र प्रसारावरच आपले लक्ष केंद्रीत केले. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने 2015 मध्ये सन्मानित करण्यात आले होते.
शिवशाहिरांनी देशभर शिवचरित्राचे आख्यान मांडण्यासाठी भ्रमंती केली. त्यांनी शिवाजी महाराजांचे चरीत्र सामान्यांना सहज समजावे यासाठी जाणता राजा या महानाट्याची निर्मीती केली. हत्ती, घोडे, उंट यांचा वापर नाटकात करण्याची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली.
राज्यात जेथे जेथे या नाटकाचे प्रयोग होत तेथे तेथे स्थानिक कलाकारांनाही या नाटकात सामावून घेतले जाई. शिवराज्याचे एकत्रित संग्रहालय असावे, या हेतूने त्यांनी शिवसृष्टी बांधण्याचे स्वप्न वयाच्या नव्वदीत पाहिले. त्यासाठी नऱ्हे आंबेगाव येथे जागा घेऊन त्यांनी त्याचे काम सुरू केले होते. मात्र अद्याप त्या कामाची पुर्तता होण्याआधीच शिवछत्रपतींचा हा शाहीर काळाच्या पडद्याआड गेला.
महाराष्ट्रावर मोहीनी
पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर आणि बाबासाहेब पुरंदरे या त्रिमुर्तींचे मराठी मनावर आजही गारूड कायम आहे. या तिघांतील स्नेहसंबंधाचे धागे अखेरपर्यंत घट्ट होते. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने या स्नेहसंबंधांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
ओघवती भाषणशैली शिवशाहीर शिवव्याख्यान देताना शिवकाल डोळ्यांसमोर अक्षरश: जीवंत करत असत. ऐकणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभा करत. ते त्यांच्या डोळ्यासमोर घडलेले प्रसंग जसाच्या तसा उभा करत असत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे वर्णन “शिवकाल जगणारा मावळा’ असे केले होते.