पणजी – ठाण्यातील एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी महिलांविषयक केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. त्यावर आता महिलांच्या स्वातंत्र्यावर बोलण्याचा हेतू त्यांच्या बोलण्यामागे होता; परंतु त्यांना ते योग्यपणे मांडता आले नाही, अशी सारवासारव अमृता फडणवीस यांनी केली आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, महिलांच्या स्वातंत्र्यावर बोलण्याचा त्यांचा हेतू होता; परंतु त्यांना हे विधान योग्यपणे मांडता आले नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने तसेच अधिक सभ्यपणे आपली भूमिका मांडता आली असती, असे त्या म्हणाल्या. महिलांच्या स्वातंत्र्याबाबत बाबा रामदेव बोलत होते. त्यांनी आपले मुद्दे अतिशय योग्य पद्धतीने मांडले. मात्र, केवळ एक वाक्य त्यांना व्यवस्थित मांडता आले नाही आणि नेमक्या याच वाक्यावरून वादंग निर्माण झाले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले होते. या वक्तव्यावरून सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही बाबा रामदेव यांना नोटीस बजावली आहे.