रोहटक – काही वर्षांपूर्वी देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या बलात्कार प्रकरणातील दोषी आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला रोहटकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राम रहीमच्या पोटात दुखू लागल्यानंतर त्याला तुरुंगातून रुग्णालयात नेण्यात आले.
अत्यंत कडकोट सुरक्षा व्यवस्थेत त्याला आज सकाळी रोहटक येथे आणण्यात आले. याआधी रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळेही मे महिन्यातच त्याला रोहटकमध्ये तपासणीसाठी आणण्यात आले होते.
यापूर्वी, गुरुग्रामला जाऊन आजारी आई नसीब कौर यांना भेटण्यासाठी राम रहीमने 21 दिवसांचा पॅरोल मागितला होता. परंतु, त्याला केवळ काही तासांची म्हणजे 48 तासांची सुटी देण्यात आली होती. 53 वर्षीय राम रहीम याला आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत बलात्कार प्रकरणात पंचकुला स्थित सीबाआय विशेष न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तो 2017 पासून रोहटकच्या तुरुंगात आहे.
राम रहिमच्या अटकेच्या वेळी पंजाब आणि हरियाणा येथे मोठा हिंसाचार झाला होता. त्याच्या समर्थकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठाच बंदोबस्त तैनात करावा लागला होता. मात्र, तरीही हिंसाचार उसळला होता व त्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.