“मला स्वतःची लाज वाटते…” बाबांचे दिवस फिरल्यावर मागितली युट्युबर गौरवची माफी; गौरव म्हणाला…

बाबा का ढाबा गौरवच्या व्हिडीओमुळे प्रकाश झोतात आला होता; मात्र बाबांनी त्याच्याचविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती...

दिल्ली – एका युट्युब व्हिडीओमुळे दिल्लीतील मालवीय नगरमधील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या व्हिडिओनंतर अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये जगत असलेल्या व उदरनिर्वाहासाठी वृध्दावस्थेतदेखील ढाबा चालवत असलेल्या कांता प्रसाद यांचे नशीबच पालटले होते. 

त्यांची परिस्थिती पाहून देशभरातून अनेकांनी त्यांना मदत केली होती. मात्र पुढे ज्या युट्युबरच्या व्हिडीओमुळे बाबा प्रकाश झोतात आले त्या गौरव वासन विरोधातच त्यांनी पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.हे प्रकरण त्यावेळी विशेष गाजलं होत.

अशातच आता व्हिडीओमुळे नशीब चमकलेल्या बाबांवर पुन्हा एकदा आपल्या जुन्या ढाब्यावर परतण्याची वेळ आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, व्हिडीओमुळे फेमस झालेल्या कांता प्रसाद यांनी मिळालेल्या मदतीतून एक नवं हॉटेल उघडलं होत. मात्र आता ते चालत नसल्याने त्यांच्यावर नवं हॉटेल बंद करून पुन्हा एकदा जुना ढाबा उघडण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, ज्या युट्युबरच्या व्हिडीओमुळे बाबा का ढाबा रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला त्या गौरव वासन याचीही कांता प्रसाद उर्फ बाबा यांनी माफी मागितली आहे. ‘गौरवने मला कोणताही धोका दिला नसून त्याच्याविरोधात केलेल्या आरोपांबाबत मला आता स्वतःची लाज वाटते’ अशा शब्दांमध्ये त्यांनी गौरवाची माफी मागितली आहे.

दरम्यान, गौरव वासन या युट्युबरने बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी माफी मागितल्यानंतर आपल्या स्वाद नावाच्या युट्युब चॅनलवर एक स्टेटस अपडेट केला आहे. यामध्ये त्याने केवळ, ‘कर्म’ असे लिहले असून सोबतच हात जोडल्याचे इमोजी पोस्ट केले आहे.  

गौरवने ‘कर्म’ असे स्टेटस टाकत एकप्रकारे बाबांना आपल्या कर्माचीच फळं मिळत असल्याचं सांगितलं आहे. गौरवच्या स्टेटसवर आता नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत असून काहींनी गौरवच्या स्टेटसला पसंती दर्शवली आहे. तर काहींनी गौरवला मोठं मन दाखवून बाबांना माफ कर असा सल्ला दिलाय.     

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.