नवी दिल्ली-उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने मात्र खान यांना स्थानिक न्यायालयात जाण्याची सूचना केली. त्यांची जामीन याचिका जलदगतीने निकाली काढण्याची सूचनाही कोर्टाने केली आहे.
आझम खान यांच्याबरोबरच ज्या अन्य लोकांवर हा खटला दाखल करण्यात आला आहे त्यांना जामीन मंजूर झाला आहे अशी बाब खान यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिली. आझम खान यांच्या अंतरिम जामिनासाठी वारंवार विनंती करूनही निर्णय घेतला जात नाही, असेही सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले होते.