नवी दिल्ली, – देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या “पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वैंकय्या नायडु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील चार मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. सायरस पुनावाला आणि एन. चंद्रशेखरन यांना “पद्मभूषण’, तर डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिंमतराव बावस्कर तसेच डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुनावाला हे सुप्रसिद्ध औषधी निर्माता आहेत. जगातील सर्वात मोठी औषधी निर्माण करणारी सिरम संस्थेचे ते संस्थापक आहेत. करोना माहामारीच्या साथीत या संस्थेने तयार केलेली लस सर्व भारतीयांना तसेच अन्य देशातील लोकांनाही सर्वोउपयोगी ठरली. त्यांच्या या कार्याची दखल घेत आज त्यांना सन्मानित करण्यात आले.
एन. चंद्रशेखरन यांनाही उद्योग व व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. ते भारतील एक नामांकित उद्योजक आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांना गौरविण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. भिमसेन सिंघल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सिंघल हे नामांकित न्यूरोलॉजिस्ट आहेत. डॉ. सिंघल यांनी मज्जतंतूचा शास्त्रीयरीत्या अभ्यास केलेला आहे. धमन्या आक्रसणे (स्क्लेरोसिस) आणि पार्किन्सन रोगावर त्यांचे संशोधन जगमान्य आहे.
दरम्यान, यावर्षी एकूण 128 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी गकाही पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले आहेत. उर्वरीत पुरस्कार दुस-या टप्प्यात 28 मार्च प्रदान करण्यात येणार आहे.