नारायणगाव – येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जी. डी. कुचेकर यांच्या गैरकारभाराची आणि मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी जुन्नर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप पांडुरंग उत्तर्डे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग अधीक्षक यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
जुन्नर व आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूची विक्री केली जात आहे. नारायणगाव उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कुचेकर हे या सर्वांकडून दरमहा काही लाखांत हप्ते वसूल करत आहेत, असा आरोप उत्तर्डे यांनी तक्रारीमध्ये केला आहे.
याबाबतचे व्हीडीओ पुरावे कुचेकर व त्यांच्या वरिष्ठांना पाठवून या दारू विक्रेत्यांकडील 18 मार्च व 20 मार्चचा दारूसाठा आणि आताचा दारूसाठा याची तात्काळ तपासणी करून लॉकडाऊन कालावधीत बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी यासाठी संदीप उत्तर्डे यांनी बुधवार (दि. 22) जिल्हा अधिकारी, पुणे तसेच अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे यांना मेलद्वारे कळविले होते.
या संदर्भात निरीक्षक जी. डी. कुचेकर यांच्याशी सायंकाळी पाचच्या सुमारास संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल स्वीच ऑफ होता.