मुंबई – कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने एबीआयएल समूहाचे अध्यक्ष अविनाश भोसले यांना सीबीआय कोठडीतून आपल्या ताब्यात घेतले आहे.
येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर आणि दिवाण हौसिंग फायनान्सचे कपिल वाधवन यांच्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना या आधी केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथेच ईडीने त्यांना सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेतले.
येस बॅंक-डीएचएफएल बॅंक फसवणूक प्रकरणातील सीबीआय चौकशीत अविनाश भोसले हे चौकशीच्या रडारवर आले होते.त्यांनी डीएचएलएफ शी संबंधीत व्यवहारात मध्यस्थ म्हणून 360 कोटी रूपयांची दलाली घेतली होती असा आरोप आहे. रेडियस डेव्हलपर्सच्या संजय छाब्रिया यांना दिवाण हौसिंग मधून कर्ज मिळवून देण्याच्या कामी अविनाश भोसले यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती व त्यासाठी त्यांना छाब्रियाकडून ही दलाली मिळाली होती.
छाब्रिया यांनी नंतर हे कर्ज बुडवले आहे. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात अटक झाली आहे.