मुंबई – येस बॅंक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा न्यायालयाने फेटाळून लावत कोठडीची शिक्षा सुनावली. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई केली आहे.
सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय न्यायालयात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयने भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. हा दावा न्यायालयाने फेटाळला आहे.
दरम्यान, अविनाश भोसले यांची येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले होते. वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश असल्याची माहिती आहे. ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
अविनाश भोसले कोण आहेत ?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भोसले यांच्यावर आता काय करावाई होते हे पाहणे महत्वाचे आहे.