क्रीडारंग : ॲथलेटिक्समध्ये अवंतिकाची भरारी

-अमित डोंगरे

भारताच्या ॲथलेटिक्समध्ये अवंतिकाची भरारीथलेटिक्‍स क्षेत्रात पुण्याच्या अवंतिका नरळे या खेळाडूने थक्‍क करणारी कामगिरी करत खूप मोठी भरारी घेतली आहे. अवंतिकासारख्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश टॉप योजनेत केला गेला पाहिजे. याच खेळाडूंमधून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणारे खेळाडू गवसणार आहेत. एक पी. टी. उषा निवृत्त झाली तर तीन दशके होऊन देखील तिची वारसदार आपल्याला मिळालेली नाही, त्याचाच शोध घेण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.

तिच्या आंतरराष्ट्रीय पदकांमुळे तिच्याकडे भविष्यातील पी. टी. उषा म्हणून पाहिले जात आहे. पुण्यातील वडगाव शेरीमधील लोणकर माध्यमिक विद्यालयातून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. केवळ सोळाव्या वर्षीच तिच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय पदके आहेत. 11 जुलै, 2003 रोजी जन्मलेल्या अवंतिकाने आठवीत असताना मैदानी खेळाला प्रारंभ केला व केवळ दोनच वर्षात तिने जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळविली. अशी कामगिरी करणारी ती पुण्याची पहिलीच खेळाडू ठरली आहे. चौदा वर्षांखालील विभागीय चाचणी स्पर्धेत तिने रिले प्राकारात सुवर्णपदक कमावताना प्रशिक्षकांचा विश्‍वास सार्थ ठरविला. आठव्या इयत्तेत असताना पहिली शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळताना तिने रिलेमध्येही सुवर्णयश प्राप्त केले.

म्हाळुंगे बालेवाडीत झालेल्या राष्ट्रीय स्पधेतही तिने पदके मिळविली आणि फेडरेशन करंडकासाठी तिची सोळा वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली. रांचीमध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदके मिळविताना स्पर्धा विक्रम साकार केला. त्यानंतर याच स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय संघात हॉंगकॉंगमधील स्पर्धेसाठी निवड झाली. तिथेही तिने सुवर्णपदकाला गवसणी घालताना शंभर मीटर रिलेमध्ये 11.97 सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धा विक्रम नोंदवला. त्याबरोबर दोनशे मीटर शर्यतीत तिला फारसे यश मिळाले नसले तरी तिच्या खात्यात रजतपदक जमा झाले. नवव्या इयत्तेतही तिने राष्ट्रीय, राज्य व शालेय राष्ट्रीय स्तरावर पदके मिळविली व राज्याची एक नैपुण्यवान खेळाडू बनण्याच्या दृष्टीने पावले टाकली.

नागपुरात झालेली स्पर्धा तिच्यासाठी माइलस्टोन ठरली. तिथे तिने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्राप्त करताना शंभर मीटर शर्यतीत 11.97 अशीच वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतून ती कॅडेट गटात असतानाही वरिष्ठ गटासाठी पात्र ठरली. यावेळी तिने देशाची अव्वल धावपटू धुतीचंदचा विक्रम मोडला व स्वत:चा विक्रम साकार केला. यावेळी तिची वेळ दोनशे मीटरमध्ये 24.60 सेकंद तर शंभर मीटरमध्ये 11.67 सेकंद अशी होती. त्यानंतरच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत चौदा व सोळा वयोगटातील स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकताना देखील स्पर्धा विक्रमाची नोंद केली. सातत्याने विक्रम करताना तिने याही स्पर्धेत बेस्ट परफॉरमन्सचा पुरस्कार मिळविला. तिला खूपच लहान वयात देखील घरून पूर्ण पाठिंबा असून याच खेळात करिअर करण्याचे व पी. टी. उषाच्या पावलावर पाऊल ठेवत देशाची प्रती उषा बनण्याचे तिचे स्वप्न आहे.

उषाच तिची प्रेरणा आहे. वडील प्लंबरचे काम करतात. मात्र, तेच तिचे प्रायोजक आहेत. पोटाला चिमटा काढत त्यांनी तिच्या खेळासाठी आवश्‍यक ते सगळे काही करण्याचे काम सातत्याने केले असून आजही ते तिच्यासाठी धडपड करत आहेत. एकही सरकारी किंवा खासगी प्रायोजक नसताना स्पाइक, कपडे, डाएट तसेच सगळ्या सोयींसाठी तिला केवळ वडिलांचीच मदत होते. आजवर तिने पन्नासपेक्षाही जास्त पदके मिळवून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील देशाला पदके जिंकून देऊनही तिच्याकडे सरकारी स्तरावर कानाडोळाच होत आहे. क्रिकेटकडे वळणाऱ्यांनी अशा खेळाडूंसाठी देखील मदतीचा हात पुढे करायला काय हरकत आहे. तिला याच वयात प्रायोजकांनी मदतीचा हात पुढे केला तर तिचा आत्मविश्‍वास अधिक उंचावेल व खेळ देखील आणखी बहरेल.
तिचे प्रशिक्षक संजय पाटणकर सांगतात की तिच्यामध्ये कमालीचा आत्मविश्‍वास असून त्याच्याच जोरावर ती सातत्याने यशस्वी होत आहे.

डाएटीशन, बॉडी ऍनालिस्ट, तंदुरुस्तीसाठी फिजिओ या व अशा कितीतरी गोष्टींची आपल्या देशात वानवा आहे. मात्र, ही परिस्थिती बदलली पाहिजे. क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ, मसाजिस्ट, क्रीडावैद्यक तज्ज्ञ अशी टीम भारतातही या खेळाडूंसाठी सज्ज असावी तरच हे खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडूंनादेखील कडवे आव्हान देतील. एकीकडे पायोली एक्‍सप्रेस पी. टी. उषा बनण्याचे तिचे स्वप्न आहे तर दुसरीकडे तिला सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागते हा विरोधाभास नव्हे का. येत्या काळात तिच्यात तांत्रिक स्तरावर आणखी सुधारणा व्हावी असे तिच्या प्रशिक्षकांना वाटते तर त्यासाठी मैदानांची अवस्थादेखील आंतरराष्ट्रीय स्तरावरची हवी तरच खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होईल.

खेलो इंडिया स्पर्धेत जशी तिने अव्वल कामगिरी करत पदकांची रास ओतली तशीच कामगिरी येत्या मोसमात तिच्याकडून झाली तर पुन्हा एकदा भारतीय संघाची दारे तिच्यासाठी खुली होतील. 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत असतानाच ज्युनिअर गटाची ऑलिम्पिक स्पर्धा देखील होत आहे. यातही अवंतिकाचा कस लागणार आहे. कारण तिच्यासमोर जगभरातील अव्वल खेळाडूंचे आव्हान असणार आहे.

खेळाडूंना टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) या योजनेत सहभागी करून घ्यायला हवे तरच त्यांना स्थैर्य तर येईलच; पण सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरणाही मिळेल. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ही योजना सुरू केली असून त्यात देशासाठी खेळलेल्या तसेच खेळण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पण अत्यंत गुणवान खेळाडूंना सहभागी करून घेतले जाते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ही योजना कार्यान्वित झाली आहे. विविध जागतिक स्पर्धा, आशियाई, आफ्रो-आशियाई, राष्ट्रकुल, विश्‍वकरंडक तसेच ऑलिम्पिक स्पर्धा व त्यातील सरस कामगिरीची अपेक्षा पूर्ण करतील असा विश्‍वास असलेल्या खेळाडूंना या योजनेत समावेश होतो. दरवर्षी यात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाते.

जर खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत असतील तर त्यांचा करार वाढविला जातो अन्यथा त्यांना या योजनेतून बाहेर ठेवले जाते. रियो (ब्राझील) ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या साक्षी मलिकलादेखील सुमार कामगिरीबद्दल या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. या योजनेत सहभागी असलेल्या खेळाडूंना प्राधिकरणाच्या नियमांनुसार मदत केली जाते. तसेच त्यांना आर्थिक पाठिंबा देखील दिला जातो. ठरावीक रक्‍कम देतानाच त्यांच्या खेळाचे विविध स्पर्धांमधील कामगिरीचे निरीक्षण करण्यात येते. खेळाडूने कामगिरीत सातत्य राखले तरच तो या योजनेत टिकून राहतो अन्यथा त्याला या योजनेतून वगळण्यात येते. अवंतिकाला या योजनेचा भाग बनविले तर येत्या काळात राज्यालाच नव्हे तर देशाला एखादी सुवर्णकन्या मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.