विज्ञानविश्‍व: ऍमेझॉन जंगल वाचवण्यासाठी

– मेघश्री दळवी

करोना महासाथीत पर्यावरण या विषयाकडे थोडं दुर्लक्ष झालं असलं तरी आज तो आपल्यापुढचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न आहे, हे विसरून चालणार नाही. गेल्या वर्षात ऍमेझॉन जंगलाविषयी अनेक बातम्या येत होत्या. त्या बहुतांशी नकारात्मक होत्या. बेबंद जंगलतोड झाल्याने त्या परिसराची होणारी हानी ही पर्यायाने संपूर्ण जगाची हानी आहे.

त्यामुळे काही देश आता त्यावर वेगळे कठोर उपाय योजण्याचा प्रयत्न करत आहेत. एका मोठ्या फ्रेंच बॅंकेने ऍमेझॉन जंगल तोडून शेती करण्यासाठी कर्ज देण्याचं बंद करायचं ठरवलं आहे. तर दुसरीकडे मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या पुरवठादारांची तपशीलवार छाननी करून त्यांचा ऍमेझॉन जंगलतोडीशी संबंध आढळल्यास त्यांच्याकडून खरेदी थांबवणार आहेत.

वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडच्या पाहणीनुसार जगातल्या एक अब्ज माणसांचं आयुष्य जंगलावर थेट अवलंबून आहे. तर उरलेले आपण सगळे अप्रत्यक्षपणे जंगलाच्या आधारे जगतो आहोत. अन्न, निवारा, ऑक्‍सिजन यापलीकडे जंगलांचे अनेक फायदे असतात. जमिनीची धूप थांबवणे, प्राणी-पक्षी यांना अत्यावश्‍यक अधिवास उपलब्ध करून देणे, आणि जैवविविधता राखणे. त्याशिवाय वातावरणातला कार्बन कमी करण्यात महासागरांच्या खालोखाल मोठमोठ्या जंगलांचा प्रचंड सहभाग असतो. वर्षाला साडेसात अब्ज मेट्रिक टन कार्बन डायऑक्‍साइड ते शोषून घेत असतात.

ऍमेझॉन हे जगातलं सर्वात मोठं जंगल. रेनफॉरेस्ट प्रकारच्या या सदाहरित जंगलाला “जगाचं फुफ्फुस’ असं टोपणनाव होतं. मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून हवा शुद्ध करण्यात या जंगलाचा पहिला क्रमांक होता. मात्र गेल्या पंधरा वर्षांमध्ये त्यातल्या सुमारे साडेचार कोटी हेक्‍टर प्रदेशात भयंकर वेगाने झाडं पाडली गेली, वणवे लागले, आणि शेतीसाठी जमिनी साफ करून घेण्यात आल्या. ब्राझील, पेरू, बोलीव्हिया, यांच्यासह नऊ देशांमध्ये पसरलेलं हे अवाढव्य जंगल आजवर कार्बन सिंक होतं. येत्या पंधरा वर्षांत ते कार्बन सोर्स ठरण्याचं संकट आहे असं नेचर मासिकाच्या गेल्या वर्षातल्या एका संशोधन अहवालात म्हटलं आहे.

म्हणजे एकूण शोषून घेतलेल्या कार्बनच्या तुलनेत त्याचं कार्बन उत्सर्जन वाढणार आहे. याच दरम्यान पृथ्वीची सरासरी तापमानवाढ अगदी धोक्‍याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपणार आहे. त्यात ऍमेझॉन जंगलाच्या कार्बन उत्सर्जनाची भर पडली तर खरोखरच हाहाकार माजेल.

यावर उपाय अनेक आहेत. राजकीय आणि आर्थिक दबाव आता सुरू झाला आहे. ऍमेझॉनच्या काही सुरक्षित भागावर अजून आक्रमण सुरू झालेलं नाही, ते सुरू होऊ न देण्याकडे पर्यावरणवादी संस्थांचं लक्ष आहे. त्यांच्या लहानमोठ्या चळवळी जोर धरत आहेत. संशोधनाचे पुरावे आणि त्याआधारे जनजागृती सुरू आहे. जंगलतोडीशी संबंधित उत्पादनं टाळण्याचं आवाहन जगभर होत आहे.

प्लॅस्टिक टाळण्यासारखं. दुसरीकडे पर्यायी उपाय शोधणाऱ्या तंत्रज्ञानावर झपाट्याने काम सुरू आहे. अनेक मोठ्या कंपन्या त्यासाठी आर्थिक मदत देत आहेत. हे उपाय कितपत यशस्वी ठरतात, हवामान बदलाला कितपत रोखू शकतात, यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.