ब्लुमफोंटेन – ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेव्हीड वॉर्नर याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय लढतीत एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने दमदार शतकी खेळी करताना सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधीक शतकांची नोंद केली.
वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येथे सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 85 चेंडूत शतक फटकावले. त्याने आपल्या एकूण 106 धावांच्या खेळीत 93 चेंडूत 12 चौकार व 3 षटकार फटकावले. ही खेळी करताना त्याने भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या सलामीवीर म्हणून फटकावलेल्या 45 शतकांच्या कामगिरीला मागे टाकले.
वॉर्नरचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 20 वे तर एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 46 वे शतक साकार केले. सलामीवीर म्हणून सचिनची 45, ख्रिस गेलची 42 आणि सनथ जयसूर्याची 41 शतके आहेत.
दरम्यान,वॉर्नरने या शतकी खेळीद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा पल्लाही पार केला आहे. त्याने 144 व्या सामन्यात 140 डावांत 20 शतके व 27 अर्धशतकांच्या मदतीने 6 हजार 136 धावा केल्या आहेत.