World Cup 2023 Australia vs South Africa Match Result : आज एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होता.या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिायाचा 134 धावांनी पराभव केला आहे. यामुळे पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा या विश्वचषकातील हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.
विश्वचषक 2023 च्या 10 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत सात गडी गमावून 311 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 106 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. तर एडन मार्करमने 44 चेंडूत 56 धावा केल्या. कर्णधार टेंबा बावुमा याने 35, रॅसी व्हॅन डर ड्युसेन आणि मार्को जॅनसेन यानी प्रत्येकी 26 धावांची खेळी केली.
डी कॉकने झंझावाती खेळी खेळली आणि 90 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 19वे शतक होते आणि या विश्वचषकातील सलग दुसरे शतक होते. डी कॉकने श्रीलंकेविरुद्धही 100 धावांची इनिंग खेळली होती.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 40.5 षटकांत 177 धावांवर गारद झाला. मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर मिचेल स्टार्कने 27 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे स्टार फलंदाज मिचेल मार्श (7), डेव्हिड वॉर्नर (13), जोश इंग्लिस (5) आणि स्टीव्ह स्मिथ (19) आणि ग्लेन मॅक्सवेल फक्त 3 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत कागिसो रबाडाने सर्वाधित तीन तर केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
All-round excellence helps South Africa continue their victorious run in the #CWC23 💪#AUSvSA 📝: https://t.co/GS4t9OwQlM pic.twitter.com/lOmGGsHblI
— ICC (@ICC) October 12, 2023
पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा या विश्वचषकातील हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात त्यांना भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकन संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात त्याने श्रीलंकेचा पराभव केला होता. क्विंटन डी कॉकला त्याच्या शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.