#AUSvPAK 2nd Test : आॅस्ट्रेलियाचा पाकला ‘व्हाईटवाॅश’

अॅडलेड : आॅस्ट्रेलिया दौ-यात पाकिस्तानच्या संघाला आणखी एका लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कसोटी मालिकेतील दुस-या सामन्यात सोमवारी आॅस्ट्रेलियाने पाकचा एक डाव आणि ४८ धावांनी पराभव केला आहे.

दुस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी उपहारानंतर दुस-या डावात पाकला २३९ धावांत गुंडाळत आॅस्ट्रेलियाने दोन सामन्याची मालिका २-० ने खिशात घालत निर्विवाद वर्चस्व राखले.

दुस-या डावात नाथन लियोनने ५ गडी बाद केले. पाककडून दुस-या डावात शान मसूद आणि असद शफीकने काही काळ संघर्ष केला पण त्यांना अपयश आले. मसूदने ६८ आणि शफीकने ५७ धावांची खेळी केली.

आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वाॅर्नरच्या नाबाद त्रिशतकी (३३५) खेळीच्या जोरावर पहिला डाव ५८९ वर घोषित केला होता. प्रत्युत्तरात पाकने पहिल्या डावात ३०२ आणि दुस-या डावात २३९ धावा केल्या. मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करणा-या डेव्हिड वाॅर्नरला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

दिवस-रात्र कसोटीच्या चौथ्या दिवशी आज पाकने ३ बाद ३९ वरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. शान मसूद आणि असद शफीफ जोडीने चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची भागिदारी करत काहीशा आशा जागवल्या.

फिरकीपटू नाथन लियोनने शान मसूदला ६८ धावांवर स्टार्ककरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर नाथन लियोनने असद शफीकला ५७ धावांवर बाद करत विजयातील अडथळा दूर केला.

इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिजवानने सहाव्या विकेटसाठी ४७ धावांची भागिदारी केली पण ही भागिदारी व्यर्थ ठरली. रिजवान ४५ आणि इफ्तिखार अहमद २७ धावांवर बाद झाला.

मोहम्मद अब्बास १ धावांवर धावबाद होताच पाकचा डाव संपुष्टात आला. मोहम्मद मूसा ४ धावांवर नाबाद राहिला. आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत नाथन लियोनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. हेझलवूडने ३ तर मिशेल स्टार्कने १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक :

आॅस्ट्रेलिया : पहिला डाव : ३ बाद ५८९ घोषित.

पाकिस्तान : पहिला डाव : सर्वबाद ३०२ (यासिर शाह ११३, बाबर आझम ९७, मिशेल स्टार्क ६/६६, पॅट कमिन्स ३/८३)

पाकिस्तान : दूसरा डाव : सर्वबाद २३९.( शान मसूद ६८, असद शफीफ ५७, मोहम्मद रिजवान ४५, नाथन लियोन ५/६९, हेझलवूड ३/६३, स्टार्क १/४७)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)