औरंगाबाद: देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हैद्राबाद मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच, औरंगाबाद मधील आठेगाव येथे एका १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा खून करण्यात आला, की बलात्कार करून तिला मारण्यात आले, हे अजून स्पष्ट झालं नाही.
पोलिसांनी या प्रकरणी चापानेर येथे राहणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने मृत तरुणीस चापानेर शिवारातील संतोष बोरसे यांच्या शेतात नेऊन अतिप्रसंग केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.२९) रात्री ८ वाजले, तरी तरुणी घरी न आल्याने आई, वडील व नातेवाईकानी शोधाशोध सुरू केली. मात्र तरुणी सापडली नाही. म्हणून तरुणीच्या घराच्यांना एका व्यक्तीवर संशय आला.
संशयित व्यक्ती हा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविण्याची मिस्तरी कामे करतो. त्यास विचारपूस केली, मात्र काहीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले. यामुळे मुलगी बेपत्ता आसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी संशयित अरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली, परंतु त्याने कबुली दिली नाही. म्हणून रात्री साडे अकरा वाजता कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवासे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, बीट जमादार मनोज घोडके यांनी आठेगाव ते चापानेर परिसर पिंजून काढला. यावेळी चापानेर शिवारात तरुणीचा मृतदेह आढळून आला. तरुणीचे प्रेत रात्रीच शवविच्छेदनासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. पुढील तपस कन्नड पोलीस करत आहेत.