ऍडलेड – ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडला पहिल्या डावांत 236 धावांवर गुंडाळले. यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 1 बाद 45 धावा करत 282 धावांची आघाडी घेतली.
2 बाद 17 धावांवरून पुढे खेळताना ज्यो रुट आणि डेव्हिड मलान यांनी सावध खेळी केली. या दोघांनी 138 धावांची भागीदारी करत संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला. या भागीदारीत ज्यो रुटने 116 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार ठोकत 62 धावा केल्या. यासह त्याने यावर्षी कसोटीत 1600 धावा पूर्ण करण्याचा टप्पा ओलांडला.
कॅमरून ग्रीनने ज्यो रुटला बाद करत दिवसातील पहिली विकेट घेतली. या पाठोपाठ डेव्हिड मलानही 80 धावा करून परतला. मिशेल स्टार्कने त्याला स्मिथ करवी झेलबाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
बेन स्ट्रोक (34) आणि ख्रिस वोक्स (24) यांनी थोडाफार प्रतिकार केल्याने इंग्लंडला पहिल्या डावात 84.1 षटकांत 236 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने 4, तर नॅथन लियॉनने 3 विकेट घेतल्या. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 17 षटकांत 1 बाद 45 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 150.4 षटकांत 9 बाद 473 धावांवर घोषित.
इंग्लंड पहिला डाव – 84.1 षटकांत सर्वबाद 236 धावा. (हासीब हमीद 6, रोरी बर्नस 4, ज्यो रुट 62, डेव्हिड मलान 80, बेन स्ट्रोक 34, ख्रिस वोक्स 24. मिशेल स्टार्क 4-37, नॅथन लियॉन 3-58, कॅमरून ग्रीन 2-24).