औरंगाबाद – शहरातील शहागंज मंडी परिसरात कुख्यात गुंडाचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. जमीर खान शब्बीर खान उर्फ जम्या असे या गुंडाचे नाव असून पैशाच्या देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडला आहे. जमीरचा खून हा त्याचाच साडू शोहेब खानच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीवरुऩ समोर आले आहे. याप्रकरणी सीटी चौक पोलिसांनी आरोपी साडू शोहेब खानला अटक केली आहे.
शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. जमीर याचा त्याच्या साडूसोबत पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता.त्यावरून त्यांच्यात अनेकदा खटकेही उडायचे. जमीर शुक्रवारी शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोरील इमारतीच्या शटरजवळ उभा होता. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जमीरचा साडू अन्य एकाला घेऊन तेथे आला. त्यांनी जमीरसोबत वाद घातला. वादाचे रुपांतर क़डाक्याचा भांडणात झाले यातूनच साडूसोबतच्या व्यक्तीने धारदार शस्त्राने जमीरवर वार केले. जमीरच्या छातीवरील वार वर्मी लागल्याने जमीर जागेवरच कोसळला. या घटनेनंतर मारेकरी तेथून पसार झाले.
मृत जमीर खान हा घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी आहे. त्याने परिसरात अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. पण मागील काही दिवसांपासून मृत जमीरने घरफोडी अथवा चोरी केली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.