पिंपरी – गेल्या तीस तासांत आगीच्या 13 घटना घडल्या. यामध्ये मोशी येथील केमिकल कंपनीला लागलेली आग ही मोठी होती. तसेच बुधवारी मोशी कचरा डेपोला लागलेली आगही यावेळी शमविण्याचे काम सुरू होते. या आगींवर नियंत्रण मिळविताना अग्निशामक दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक झाली.
बुधवारी सांयकाळी पाच वाजता मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्याची वर्दी मिळाली. याठिकाणी मुख्य अग्निशामक केंद्राच्या दोन, तसेच भोसरी, चिखली, तळवडे, प्राधिकरण यांच्या प्रत्येकी एक बंब आग शमविण्याचे काम करीत होता. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारीही चिखली, तळवडे, भोसरी आणि पिंपरीचे प्रत्येकी एक बंब आग शमवित होते. तर शुक्रवारी भोसरी येथील बंब आग शमवित होता.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमान वाढत आहे. यामुळे आगीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पारा चाळीसच्या वर जात आहे. यामुळे कचरा, ट्रान्सफॉर्मर, ज्वलनशील पदार्थ पेट घेत असल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुरूवारी रात्री दुसऱ्या पाळीतील अग्निशामक जवान पुन्हा अग्निशामक केंद्रात परतण्याच्या तयारीत असताना मोशी येथील जे. के. ब्रुम सेंटर या केमिकल कंपनीत आग लागल्याची वर्दी आली. त्यामुळे अग्निशामक दलाच्या बंबाना उपकेंद्रात न येता त्वरीत घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले.
या आगीच्या ठिकाणी मुख्य अग्निशामक केंद्रातील दोन, भोसरी, चिखली, तळवडे, प्राधिकरण, थेरगाव या अग्निशामक उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे एकूण सात बंब दाखल झाले. मात्र ही आग लवकर आटोक्यात येणार नसल्याने टाटा कंपनी, बजाज कंपनी, फोर्स मोटार, खडकी कॅन्टोमेंट बोर्ड, महेंद्रा कंपनी (चाकण), आळंदी नगर परिषद, चाकण एमआयडीसी, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि दहा टॅंकर घटनस्थळी दाखल झाले. गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास लागलेली आग शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास आटोक्यात आली.