पिंपरी, (प्रतिनिधी) – जितेंद्र आव्हाड प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, त्यांनी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करतो. त्यांनी फक्त समाजाची माफी मागून चालणार नाही तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून राजकारणातून निवृत्ती घ्यावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी केली.
अमित गोरखे म्हणाले की, राजकारण आणि प्रसिद्धीचा एवढा हव्यास की, आपल्या हातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना होत आहे, याचे भानसुद्धा त्यांना राहिले नाही. मनुस्मृती, संविधान यावर खोट्या व चुकीचा समज समाजात पसरवून ते विष कालवण्याचे काम करत आहेत.
महामानवाचा फोटो, प्रतिमा कुठेही दिसली तर लहान मुलगाही नतमस्तक होतो. आणि आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो दिसू नये हे मोठे आश्चर्य म्हणावे लागेल. चूक मुद्दाम करायची आणि मग माफी मागायची त्यांची सवय संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी केलेली चूक ही अक्षम्यच आहे.
त्यामुळे त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून शिक्षा व्हावी. त्यांनी फक्त समाजाची माफी मागून भागणार नाही तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून राजकारणातून निवृत्ती घ्यावी, अशी मागणी गोरखे यांनी केली आहे.