पुणे – मनसे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या मनधरणीसाठी मनसे नेते बाबू वागसकर यांनी शुक्रवारी सकाळी मोरे यांची भेट घेतली. तसेच येत्या सोमवारी वागसकर स्वत: मोरे यांना मनसे अध्यक्षांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मोरे यांनी थेट मनसे अध्यक्षांच्या आदेशालाच विरोध केल्याने त्यांच्यावर मनसेकडून कारवाई होण्याचा अंदाज लावत राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिवसेनेकडूनही मोरे यांच्यासाठी गळ टाकण्यात आला आहे.
शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह वरून सरदेसाई यांनी मोरे यांच्याशी चर्चा करून त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याचे निमंत्रण दिले आहे. मशिदसमोर भोंगे लावण्याच्या आदेश पाळण्यास नकार देत प्रभागातील मुस्लीम समाजाशी आपली नाळ जोडली गेली असून प्रभागात शांतता राखण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, असे सांगत मोरे यांनी पक्षादेश नाकारला होता. त्यानंतर, झालेल्या वादातून पक्षाने मोरे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करत मनसेचे माजी गटनेते साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. तर, मनसेतील शहर पदाधिकाऱ्यांकडूनही मोरे यांच्यावर निशाना साधला होता. त्यानंतर, पक्षातील वाद वाढल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती. तर, शुक्रवारी थेट शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना मोरे यांच्याशी चर्चा करायची आहे, असा निरोप गेला. या घडामोडी होत असतानाच, मनसे नेते बाबू वागसकर यांनी मोरे यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
पक्षाच्या बैठकांना दांडी
मोरे यांनी आपली निष्ठा मनसेसोबतच असून आपण मनसे सोडणार नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. तर बाबर यांनी शहराध्यक्षाचा पदभार घेतल्यानंतर मोरे यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपदाची जबाबदारी असून पक्षाने बोलविलेल्या सर्व बैठकांना ते उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सलग दुसऱ्या दिवशी मोरे पक्षाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहिले नसल्याची माहिती आहे.