बारामती, (प्रतिनिधी)- बारामती सहकारी बँकेने आर्थिक वर्षअखेरीस ३१ मार्च २०२४ अखेर ३५८४ कोटींचा व्यवसाय करीत ६७.४० कोटी रूपये तरतुदीपुर्व ढोबळ नफा प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.
बँकेच्या आजवरच्या मिळालेल्या ढोबळ नफ्यामध्ये यंदाचा ढोबळ नफा विक्रमी असून सर्व तरतुदी पूर्ण करीत बँकेने ५ कोटी ७० लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचे नक्त मूल्य १५४ कोटींवर पोहोचले असून बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली करत एनपीएचे (अनुत्पादक जिंदगी) प्रमाण कमी करण्यात यश प्राप्त केले आहे.
बँकेचे पुणे, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, रायगड अशा सहा जिल्हयांत कार्यक्षेत्र आहे. बँकेच्या ३६ शाखा व एक विस्तारित कक्ष आहे. ई टॅक्स, ई स्टॅपिंग, पॅन कार्ड, मोबाइल बँकींग, विमा सेवा, युपीआय पेमेंट या सुविधांसह आरटीजीएस,
एटीएम सुविधा दिल्या जात असून, बँकेची स्वतःची संगणकीय प्रणाली विकसित आहे. नेट बँकिंगची सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहे. लवकरच रिझर्व्ह बँकेकडून नेट बँकिंगची परवानगी मिळेल, असे अध्यक्ष सातव यांनी सांगितले.