पुणे – “इथे थंकले का’ विचारल्याने तलवारीने डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना 10 वर्षे सक्तमजुरी आणि 9 हजार 300 रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. 2011 मध्ये मार्केट यार्ड येथील डायसप्लॉट भागात घडलेल्या घटनेत तब्बल 11 वर्षांनी शिक्षा झाली आहे.
रफिक उमर शेख (वय 38), फोरोज गुलाम हुसेन (वय 33), अफजल उमर शेख (वय 34), मुद्दसर ऊर्फ सोनू साबीर खान (वय 31), मुनावर ऊर्फ मोनू साबीर शेख (वय 31) आणि सुद्दाम उमर शेख (वय 31, सर्वजण, रा. डायसप्लॉट झोपडपट्टी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गोवर्धन खुडे यांनी फिर्याद दिली आहे. खुडे याच्या मामाचा मुलगा कृष्णा लोंढे यामध्ये जखमी झाला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. 21 ऑक्टोबर 2011 रोजी डायसप्लॉट झोपडपट्टी येथे ही घटना घडली.
आरोपी अफजल शेख याला “इथे का थंकला’ असे फिर्यादी आणि लोढे याने विचारले. याचा राग मनात धरून सर्वजण हातात लाथा, काठ्या आणि शस्त्रे घेऊन दोघे उभारलेल्या ठिकाणी गेले. हात, लाथाबुक्क्या तलवारी, कोयता, पाईप आणि लाकडी दांडक्यांनी लोंढे याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.