मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे.
सचिन सातपुतेच्या चौकशी नंतर शिवसेनेने नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
ही अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नारायण राणे नागपूर दौरा सोडून कणकवलीत आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, नितेश राणेंनी काहीही केलेले नसून केवळ सुडाच्या भावनेतून हे आरोप करण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सत्तारुढ लोकांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे.