- वाकड पोलिसांकडून दोघांना अटक
- नऊ गुन्हे उघडकीस
पिंपरी – युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एटीएम फोडणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.
महादेव प्रकाश तिर्थे (वय 19, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), निशांत ज्ञानेश्वर गुळुंजकर (वय 24, रा. चिंतामणी चौक, चिंचवड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस ठाण्याचे कर्मचारी वंदू गिरे यांना एटीएम फोडणारे दोन आरोपी थेरगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तिर्थे आणि गुळुंजकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. वाकड, तळेगाव दाभाडे, चिखली, निगडी, चिंचवड, चाकण भागामध्ये सहा महिन्यांत एटीएम फोडल्याची आरोपींनी कबुली दिली.
आरोपी हे युट्यूबवर व्हिडिओ पाहून चोरी करण्यासाठी एटीएम फोडत होते. त्यांना अटक करून पोलिसांनी वाकड, निगडी, चिंचवड, चाकण या पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या प्रत्येकी एक तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील दोन तसेच चिखली पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल केली.