सुप्रिया सुळे यांनी दिला कार्यकर्त्यांना सज्जड इशारा
औरंगाबाद: मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आजचा दिवस मोठा वादळी ठरला. सुप्रिया सुळे यांच्या पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक नेत्यांमधील गटबाजी उफाळून आली आणि भर कार्यक्रमात अक्षरशः राडा झाला. त्यामुळे थेट सुप्रिया सुळे यांनाच माईक हातात घेऊन कार्यक्रम नियंत्रणात आणावा लागला.
सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पैठण येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळव्यात पक्षाचे दत्ता गोर्डे आणि संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. हा सगळा गोंधळ सुप्रिया यांच्यासमोरच झाला.
तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना विधानसभा निवडणुकीतील विषय मांडण्यात आला. वाघचौरेंनी मदत केली असती, तर गोर्डेंना एक लाख मतं मिळाली असती, असे गोर्डे समर्थक म्हणाले. त्यावर सुळे यांनी ही बैठक तालुक्यातील विकासाकामांच्या संदर्भात असल्याचे सांगितले. त्यानंतरही हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आणि दोन्ही गटात राडा झाला.
हे संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी माईकचा ताबा घेतला. आता फक्त मी बोलणार, असे सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष माझ्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून कष्टाने उभा केला आहे. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे. तुमचा मान, आदर मी करतेच. तुमच्या भावनाही समजू शकते. पण, गालबोट लावणाऱ्याला मी माफ करणार नाही. मी कुठल्या बापाची लेक आहे, तुमच्या लक्षात आहे. गाठ माझ्याशी आहे. माझ्या बैठकीत पहिल्यांदा असा गोंधळ झाला आहे. ही बैठक माझ्यासाठी आठवणीत राहिल, असा दम देत त्यांनी अर्ध्यावरच हा कार्यकर्ता मेळावा संपल्याची घोषणा केली.