अहमदाबाद – अहमदाबाद मधील नव्याने बांधण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडियमच्या उद्घाटन प्रसंगीच त्या स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत होता पण त्या कार्यक्रमाचा स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमाशी काही संबंध नाही असा खुलासा गुजरात क्रिकेट असोशिएशनने केला आहे. हे स्टेडियम गुजरात क्रिकेट असोशिएशनच्या मालकीचे आहे.
स्टेडियम उद्घाटनाचा कार्यक्रम स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल असे गुजरात क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष धनराज नाथवानी यांनी पत्रकारांना सांगितले.या आधी स्थानिक पोलिस आणि संबंधीत अधिकाऱ्यांनी या स्टेडियम मध्ये उद्घाटनाच्या निमीत्तानेच नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान या स्टेडियमची क्षमता एक लाख 10 हजार प्रेक्षकांची आहे. या आधी या जागेवर जे जुने स्टेडियम होते ते पाडून तेथे हे नवीन स्टेडियम उभारण्यात आले आहे. एकूण 64 एकर जागेवर हे स्टेडियम आहे.