जाकार्ता – इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ता शहरातील कारागृहाला बुधवारी पहाटेच्या सुमाराला लागलेल्या आगीत 41 कैदी होरपळून मरण पावले अन्य 80 जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरण्यात आले आहेत त्याचाहीं मोठा फटका या दुर्घटनेत बसला आहे.
आग विझवण्यासाठी पोलिसांबरोबरच लष्करी जवानांचीही मदत घेण्यात आली. त्यांनी काही तास अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. इतकी भीषण आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजून समजू शकले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.
इंडोनेशियाच्या कारागृहातील दंगली आणि तुरूंग फोडून जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यातूनही मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार घडतात. तथापि आजचा हा प्रकार घातपाताचा प्रकार नव्हता. ही आग अपघातानेच लागली आहे असे तुरूंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.