कोथरूड -कोथरूड, वेदभवनकडून महामार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता खुला झाल्यावर कोथरूडकडून मुंबई, मुळशी आणि बावधनला जाणाऱ्या वाहनचालकांचा वळसा कमी होणार आहे. येत्या दिड महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
एनडीए चौकातील (चांदणी चौक) रस्तारूंदीकरण आणि उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. महामार्गावरील लेन वाढविल्यामुळे चौकातील वाहतूक ेंकोंडीने काहीसा मोकळा श्वास घेतला. मात्र, कोथरूड, वेदभवनकडून मुंबई, मुळशी किंवा बावधनला जाणाऱ्या वाहनचालकांना जवळपास एक किलोमिटरचा वळसा मारून महामार्गावर यावे लागत आहे. हा रस्ता चढ आणि उताराचा असल्यामुळे वाहनांचा वेग मंदावलेला असतो यातून कोंडीही होते, त्यामुळे पर्यायी मार्ग लवकर खुला व्हावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
दरम्यान, महामार्गालगत वेदभवनकडून येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. केवळ चौकातील अपूर्ण कामामुळे पुढील कामाला वेळ लागत असून, पुढील एक ते दीड महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यावर सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे नागरिकांचा एक किलोमिटरचा वळसा टळणार आहे.
महामार्ग मोठा; मात्र पर्यायी मार्ग नाही
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडून महिन्याभरात लेनची संख्या वाढविण्यात आली आणि महामार्ग मोठा झाला. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न 80 टक्के सुटला. चौकातील काम पूर्ण झाल्यावर नक्कीच पर्यायी मार्ग उपलब्ध होतील, मात्र सध्या तरी बावधन, मुळशी, कोथरूड, वारजेकडून इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहनचालकांना एकच मार्ग असून, पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने सकाळ आणि संध्याकळी वाहनांची कोंडी होत आहे, त्यामुळे हे मार्ग सुरू झाल्यावर वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळू शकेल.