लक्झरी बसच्या धडकेत दोघींचा मृत्यू ः लोणी काळभोरजवळील घटना
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आज पहाटे लक्झरी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांचा मृत्यू झाला.
सुरेखा नरसिंग घायाळू (वय 38), ममादेवी सूर्यवंशी (वय 47, दोघेही रा. खंडाळा, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी मृत्यू झालेल्या मुलगी व मावशीची नावे आहेत. ही मंगळवारी (दि. 24) पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेखा घायाळू यांचे वडील तुळशीराम माणिक मुळे (वय अंदाजे 65, रा. माळीमळा, लोणी काळभोर) मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना भेटण्यासाठी सुरेखा व मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गुलबर्गा येथून लक्झरी बसने सोमवारी (दि. 23) निघाल्या होत्या. त्यांची बस लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथे मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आली.
त्यावेळी त्या दोघींनी लक्झरी बस थांबविण्यास सांगितली. मात्र बसवाल्यांनी तेथे थांबा नाही, बस थांबत नाही असे सांगून दोघींना हडपसर येथे उतरविले. हडपसर येथून सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास रिक्षाने त्या दोघी माळीमळा येथे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास उतरल्या. रस्ता ओलांडून जात असताना, सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसने त्यांना चिरडले.
माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी लक्झरी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
…तर दोघींचे वाचले असते प्राण
सुरेखा घायाळू व मंमादेवी सूर्यवंशी या गुलबर्ग्यावरून लक्झरी बसने निघाल्या होत्या. लक्झरी बस चालकाने थोडा विचार केला असता, दोन्ही महिला आहेत. आपण माळीमळ्यात बस थांबवू, तर त्या दोघी कदाचित सुखरूप घरी गेल्या असत्या; मात्र त्याने तेथे गाडी न थांबविता दोघींना हडपसर येथे उतरविले.