- केंद्रीयमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांचे खासदार बारणेंना आश्वासन
पिंपरी – पिंपरीतील एचए (हिंदुस्थान ऍन्टीबायोटिक्स) कारखान्यात करोना प्रतिबंधक लस निर्मितीची परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना दिले आहे. बारणे यांनी याबाबत केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र पाठवून “एचए’ मध्ये लस निर्मितीबाबत मागणी केली होती. याबाबत सदानंद गौडा यांच्याशी दूरध्वनीद्वारे बारणे यांनी केलेल्या चर्चेदरम्यान लसनिर्मितीची परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.
पिंपरीतील हिंदुस्थान ऍन्टीबायोटिक्स 1955 पासून औषध निर्मितीमध्ये कार्यरत आहे. मध्यंतरी हा कारखाना डबघाईला आला असताना देखील “एचए’ने करोना कालावधीत पीपीई किट, सॅनिटायझर व इतर उत्पादनांची निर्मिती केली. त्यातून 100 कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे कोरोनावरील लस निर्मितीची ‘एचए’ला परवानगी देणे गरजेचे आहे. कंपनीने तशी मागणीदेखील केंद्र सरकारकडे केला आहे. सद्यस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे.
सध्या सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक कंपनीमार्फत करोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन सुरु आहे. केंद्र सरकार लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत दोन कोटी डोसचे उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. मागणी आणि पुरवठा यात संतुलन साधण्याठी केंद्र सरकार आवश्यक पाऊल उचलत आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. मागील काही संसर्गजन्य, साथ आजारांचा विचार करता “एचए’ने केंद्र सरकारला नेहमीच मदत केली आहे. आता केंद्र सरकारने लस निर्मिती, रेमडेसिविरच्या उत्पादनाची एक संधी एचएला दिली तर याठिकाणी रेमडेसिवीर आणि करोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन होऊ शकेल, ही बाब खासदार बारणे यांनी फोनवरील चर्चेदरम्यान गौडा यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.