अमरावती – नायब तहसीलदारांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना न्यायालयाने 3 महिने कारावास आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठाविला आहे. तसेच दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. यानंतर बोंडे यांनी आपल्या वकिलांमार्फत तातडीने जामिनासाठी अर्ज केला आणि दंडाची रक्कम भरल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.
या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस अडकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. ही घटना 30 सप्टेंबर 2016 रोजी वरूड येथील तहसील कार्यालयात घडली होती.
न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, वरूड येथील नायब तहसीलदार नंदकिशोर काळे हे आपल्या कक्षात असताना डॉ. अनिल बोंडे यांनी त्यांना तहसीलदारांच्या कक्षात बोलावले. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेअंतर्गत माझ्या लोकांच्या 240 प्रकरणांमध्ये त्रुटी का काढल्या, अशी विचारणा करून बोंडे यांनी नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना शिवीगाळ केली. तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर त्यांना मारहाण केली.
याप्रकरणी काळे यांनी वरूड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात 8 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने डॉ. अनिल बोंडे यांना शिक्षा सुनावली.