#AsiaCup2023 Super-4 India vs Pakistan : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan )सामना रंगला होता. मात्र कालच्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाने खोडा घातला असल्याने
खेळ थांबला आहे.
257 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 11 षटकात 2 गडी गमावून 44 धावा केल्या आहेत. बाबर आझम आणि इमाम उल हक बाद झाले आहेत. फखर जमान आणि मोहम्मद रिझवान क्रीजवर आहेत. भारतासाठी वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. बुमराह आणि हार्दिकने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
तत्पूर्वी, सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 2 बाद 356 असा धावांचा डोंगर उभा केला. चार महिन्यांनंतर संघात पुनरागमन केलेल्या लोकेश राहुलसह स्टार फलंदाज विराट कोहलीनेही नाबाद शतकी खेळी केली. या सामन्यात रविवारी पावसाने खोडा घातल्याने उर्वरित सामना सोमवारी खेळवण्यात आला. रविवारी कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली होती व मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आणि कोहली व राहुल यांनी त्यावर कळस चढवला.
रविवारच्या 2 बाद 147 धावांवरून पुढे खेळ सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा पावसाने खेळ केला. त्यामुळे सामना उशिरा सुरु झाला. मात्र, कोहली व राहुल यांनी पहिल्यापासूनच पाकिस्तानच्या गोलंदाजांना डोईजड होऊ दिले नाही व अफलातून फटकेबाजी केली. या जोडीने संघाचे दीडशतक पार केले. त्यानंतर राहुलने धावांचा वेग वाढवला. दरम्यान या जोडीने आपापली अर्धशतकेही पूर्ण केली. त्यानंतचर संघाचे द्विशतकही साकार केले. यावेळी कोहलीला तब्बल तीन जीवदाने मिळाली. त्याचा पुरेपूर लाभ घेत त्याने टोलेबाजी केली.
राहुलने अचामक गिअर बदलला व हल्ला चढवला त्यामुळे पाकिस्तानचे गोलंदाज बॅकफुटवर गेले. कोहलीने राहुलसह संघाचे त्रिशतकही फलकावर लावले. हे दोघे शतकाच्या जवळ आलेले असतानाही त्यांनी धोका पत्करुन फटकेबाजी केली व आपापली शतकेही पूर्ण केली. त्यांनी अखेरच्या पाच षटकात चौकार व षटकारांची बरसात करत संघाला साडेतीनशेपेक्षा जास्त धावांचा टप्पा गाठून दिला. राहुलने नाबाद 111 धावांच्या खेळीत 106 चेंडूत 12 चौकार व 2 षटकार फटकावले.
कोहलीनेही शतक साजरे करताना नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 94 चेंडूत 9 चौकार व 3 षटकार फटकावले. या जोडीने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या गड्यासाठी 233 धावांची विक्रमी भागीदारी केली. पाकिस्तानकडून शादाब खान व शाहीन शाह आफ्रीदी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.