BAN vs AFG Asia Cup : आशिया कपच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर रविवारी (3 सप्टेंबर) झालेल्या या विजयासह ‘ब’ गटातील बांगलादेशचे गुणाचे खाते उघडले आहे. आता त्याचे दोन सामन्यांत दोन गुण झाले असून सुपर-4 मध्ये जाण्याच्या त्याच्या आशा जिवंत आहेत.
दुसरीकडे अफगाणिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता सुपर-4 गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. गट-ब मधून सुपर-4 मध्ये कोणते संघ जातील हे या सामन्यातून ठरेल. श्रीलंकेचे एका सामन्यात दोन गुण आहेत.
दरम्यान, आशिया कपच्या चौथ्या सामन्यात(BAN vs AFG) बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने हा निर्णय योग्य असल्याचे दाखवत 50 षटकांत 5 बाद 334 धावा केल्या.
बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज (112) आणि नझमुल हुसेन शांतो (104) यांनी शतके झळकावली. मिराजने 119 चेंडूत सात चौकार, तीन षटकार ठोकले. तो 112 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. नजमुलने 105 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर मुशफिकुर रहीमने 15 चेंडूत 25 आणि शाकिबने 18 चेंडूत 32 धावा करत बांगलादेशची धावसंख्या 334 पर्यंत पोहोचली.
गोलंदाजीत राशिद खान आणि मुजीब उर रहमान अफगाणिस्तानसाठी प्रभाव पाडू शकले नाहीत. राशिदने 10 षटकात 66 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मुजीबने 62 धावांत एक विकेट घेतली. मोहम्मद नबीनेही 10 षटकात एकही विकेट न घेता 50 धावा दिल्या.
विजयासाठी 335 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ 44.3 षटकांत 245 धावांवर गारद झाला. त्याच्याकडून इब्राहिम झद्रानने 75 आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने 51 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाने जास्त काळ टिकण्याचे धाडस दाखवले नाही. रहमत शाहने 33 धावा केल्या मात्र चांगल्या सुरुवातीनंतर तो बाद झाला.
बांगलादेशकडून तस्किन अहमदने चार आणि शरीफुल इस्लामने तीन बळी घेतले. हसन महमूद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.