पुणे -राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गतच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळामधील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाइनसह इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले दीड वर्षांपासून घरी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शारिरीक, मानसिक तणाव येऊन दुष्परिणाम होत असल्याचे आढळून आले.
जास्त काळ शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांच्या नुकसान भरून काढणे कठीण होणार आहे. त्यामुळे नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
प्रकल्प कार्यालयस्तरीय समितीने व शाळा ज्या गावात आहे तेथील ग्रामपंचायत यांनी ठराव करून निकषांच्या आधारे 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली होती.पालकांशी चर्चा करूनच शाळा सुरू करण्याचा ठराव करण्याचे बंधन घातले आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याशी समन्वय साधून उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
15 दिवसांच्या आत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी लसीचा किमान एक डोस घेतला नसल्यास अशा कर्मचाऱ्यांना विनावेतन रजेवर पाठविण्यात येणार, लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच शाळेवर रुजू करून घेण्यात येणार आहे.