मेलबर्न – इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पदार्पण केलेला नवोदित वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड याने अवघ्या 7 धावांत 6 गडी बाद करण्याची कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्याला अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात असलेले मुलाघ पदक मिळाले. बोलंड या कसोटीचा मानकरीही ठरला.
हे पदक प्रदान करण्याची सुरुवात गेल्या वर्षीपासून सुरू झाली व त्यातही विशेष म्हणजे भारताच्या अजिंक्य रहाणेला पहिले मुलाघ पदक मिळाले होते. बॉक्सिंग डे कसोटीत सरस कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हे पदक देण्यात येते. रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करताना मेलबर्नला झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत 112 धावांची खेळी केली होती.
मुलाघ पदकाचा इतिहास
ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला कर्णधार बनलेल्या जॉनी मुलाघ यांच्या नावावरून या पदकाचे नामकरण 152 वर्षापूर्वी करण्यात आले आहे. मुलाघ यांनी 1868 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले होते.
मुलाघ यांनी आपल्या कारकिर्दीत 45 कसोटी सामने खेळले. त्यातील 71 डावात त्यांनी 1 हजार 698 धावा केल्या होत्या. गोलंदाजीतही त्यांनी चमकदार कामगिरी करत 257 बळी घेतले होते. मुलाघ यांनी 1866 साली मेलबर्न मैदानावर खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत चमकदार कामगिरी केली होती.