“आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या’, मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीत हळहळ

पुणे – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ‘आशालता वाबगावकर’ (वय ७९) यांचे आज पहाटे चार वाजता कोविड न्यूमोनियामुळे निधन झाले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी नाट्य व सिनेसृष्टीत काम केले आहे.

दरम्यान, आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, यांच्या निधनावर जेष्ठ अभिनेते सराफ यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री  रेणुका शहाणे यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अशोक सराफ –
“त्या माझ्या गुरू भगिनी होत्या. एकाच वेळी आम्ही स्टेजवर एंट्री घेतली होती. १९५७ मध्ये आम्ही दोघांनी संशय कल्लोळमध्ये काम केलं होतं. त्या एक चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. ही नाट्यसृष्टी किंवा चित्रपट सृष्टीची न भरून निघणारी पोकळी आहे’.

अमोल कोल्हे –
“ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. ही दुःखद बातमी ऐकून धक्का बसला. त्या मूळच्या गोव्याच्या होत्या. त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील एक सहृदयी मार्गदर्शक कलाकार आपल्यातून गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” असं कोल्हे म्हणाले.

 

रेणुका शहाणे –
‘आज फार हतबल झालेय. कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला. आशालता ताई अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच बाळा म्हणत आशीर्वाद देणाऱ्या आशालता ताईंच्या आत्म्याला शांती लाभो..”अशा शब्दांत रेणुका यांनी भावना व्यक्त केल्या.

सुभोध भावे-  
प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी,चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची “माँ” , आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या, आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली. असं सुभोध भावे म्हणाला.

दरम्यान, एका वाहिनीवर काळूबाई मालिका सुरु आहे. या मालिकेचे चित्रिकरण सातारा जिल्ह्यात सुरु होते. चित्रिकरणादरम्यान मुंबईतील काही नर्तक कलाकार एक दिवस सहभागी झाले होते. त्यावेळी मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचाही समावेश होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.