पवनावरून मावळात राजकीय खडाजंगी

हल्ला’बोल’ : आजी-माजी आमदारांमध्ये वाक्‌युद्ध 

पिंपरी – गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागताच “पाणी’दार मावळात विरोधाचे ढग दाटू लागले आहे. “जलवाहिनी’च्या समर्थनार्थ आणि विरोधाची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संघर्ष अल्पावधित शिगेला पोहोचला. 

महाविकास आघाडीमधील सत्तेचे वाटेकरी असलेल्या राष्ट्रवादीची धुरा आपसूक आमदार सुनील शेळके यांच्या खांद्यावर आली. भाजपकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी अपेक्षित “टायमिंग’ साधला आणि कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे “प्रेझेंट’ करीत निशाणा साधला. राजकीय खडाजंगीत भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संघर्षाच्या राजकीय ठिणगीने ऐन पावसाळ्यात पेट घेतल्याची बाब अधोरेखित झाली आहे. एकेकाळी पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाविरोधात लढा देणाऱ्या आमदार शेळके यांना आता भाजपच्या आरोपांचे “बाण’ परतवून लावताना होणारी कसरत लपून राहिलेली नाही, हे मात्र नाकारून चालणार नाही. 

मागील नऊ वर्षांपासून बंद असलेल्या पवनाजलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेत हालचाली सुरू झाल्याने पवनाबंद जलवाहिनीच्या चर्चेला उधाण आले आहे. 2011 रोजी पवनाबंद जलवाहिनीच्या प्रकल्पास विरोध करताना मावळातील 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले होते. याचे भावनिक राजकारण करून आमचा पवना बंद जलवाहिनीच्या प्रकल्पास विरोध आहे, असे मावळातील नागरिकांना भासवतात.

दुसरीकडे पवना बंद जलवाहिनीचे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू, असे पिंपरी-चिंचवडकरांना सांगून 2011 पासून पवना बंद जलवाहिनीच्या नावाखाली मतांचे राजकारण केले जात आहे. जर भाजपचा या प्रकल्पास विरोध होता, तर भाजपची केंद्रात व राज्यात सत्ता असताना हा प्रकल्प रद्द का केला नाही ? असा सवाल उपस्थित करीत आमदार शेळके यांनी भाजपच्या नेत्यांना खिंडीत गाठले.

भाजपची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आहे. या शहराची लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार आता महापालिकेने पवना प्रकल्पाला गती देण्यासाठी सल्लागाराची नियुक्‍तीचा विषय स्थायी समितीमध्ये मंजूर केला गेला. भाजपची पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्‍यातील भूमिका वेगवेगळी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाविषयी भाजपची भूमिका दुटप्पी असून, राजकारणाचा खेळ बंद करावा, अशी टिपण्णी आमदार सुनील शेळके यांनी केली.

आमदार शेळके यांनी हल्लाबोल केल्यानंतर भाजपने “टायमिंग’ साधत प्रतिहल्ला केला. भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील या “हल्लाबोल’मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांनी हा प्रकल्प रद्द केला आहे, असा शासन निर्णय आणल्यास त्यांचा भाजपकडून सन्मान करण्यात येईल, अशी उपरोधित टीका केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी देण्यास मावळवासीयांचा विरोध नाही, विरोध आहे ती बंद जलवाहिनीद्वारे करण्यात येणाऱ्या प्रकल्पाला. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवडकरांसाठी आवश्‍यक असलेला पवना जलवाहिनी प्रकल्प आणि आंदोलनात बळी गेलेल्यानंतर मावळवासीयांचा विरोध याचा सुवर्णमध्य साधण्यात लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार शेळके यांना मोठी कसरत होईल, यात दुमत नाही.

राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याची खेळी
सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस महाआघाडी सरकार आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. राज्य शासनाने कोणतेही आदेश नसताना महापालिकेने प्रकल्पासाठी सल्लागार नेमणुकीचा खटाटोप केला. सल्लागार नेमणुकीच्या विषयास “स्थायी’ने मंजुरी दिली. एकीकडे भाजपने पवना प्रकल्पाला गती देण्याचा नियोजन केले आहे. तर दुसरीकडे मावळ तालुक्‍यात भाजपचा प्रकल्पाला कडाडून विरोध आहे. भाजपच्या या दुहेरी खेळीमुळे मावळात राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याची खेळी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याशिवाय प्रकल्पाला गती देण्यासाठी स्थानिक भाजपला कोणाची फूस आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

विधानसभेनंतर सूर बदलला?
भाजपकडून तिसऱ्यांदा कोणालाही विधानसभेसाठी उमेदवारी दिली जात नाही, त्यादृष्टीने सुनील शेळके हे विधानसभेसाठी इच्छुक होते. तशी तयारी त्यांनी केली होती, मात्र पक्षाच्या दुसऱ्या उमेदवार यादीत बाळा भेगडे यांचे नाव झळकले. त्यानंतर सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तंबूत दाखल होत विधानसभेचे मैदान मारले. तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पराभूत केले. “पवना प्रकल्पा’चा मुद्दा उचलून एकाच तिकीटावर तोच खेळ करीत भाजप राजकारण करीत आहेत, त्यामुळे आता एकेकाळी पवना प्रकल्पाच्या समर्थनार्थ असलेले आमदार शेळके यांच्यात बदल झाल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.