देहूगाव/ पिंपरी –
भेटी लागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।….
पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी कासवीस झालेले वारकरी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन गळ्यामध्ये टाळ, मुखामध्ये नाम आणि वीण, मृदंगाच्या नादावर ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत देहूनगरीतून भूवैकुंठ असलेल्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. देहूनगरीला निरोप देत पालखी सोहळा आज उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाला.
स्वत: भगवान परमात्मा सकल संत मंडळींना आषाढी, कार्तिकी वारीला मला विसरू नका, असे आवाहन करत असल्यामुळे राज्यातून आणि देशातील विविध प्रांतातून भाविक वारीत सहभागी होत असतात. आज इनामदार वाड्यातील पहिला मुक्काम करत, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र देहूचा फुलांच्या वर्षावात देहूकरांनी तुकोबाच्या पालखीला निरोप दिला.
तर उद्योगनगरीत महापालिका प्रशासन व राजकीय, सामाजिक संघटना, संस्थांच्या वतीने तुकोबांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. उद्योगनगरीकडे प्रावस करताना आपले निस्सीम भक्त अनगडशाहवली बाबांच्या दर्ग्याला भेट दिली. शनि मंदिराजवळ विसावा घेत, भारतीय सैन्य दलाला, मार्गावरील ग्रामस्थ, शहरवासीयांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा उद्योगनगरी पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वागत स्वीकारुन मंगळवारी (दि.21) सायंकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात विसावला.
संत तुकाराम महाराज संपूर्ण विश्वातील मानवजातीला अखिलकोट ब्रह्मांडनायक पंढरीसी परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा उपदेश करत आहेत. ते म्हणतात, पंढरीसी जारे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ।। वाट पाहे उभा भेटीची आवडी । करावी तातडी परमार्थाची।।… त्यामुळे तुकोबांचा उपदेश शीर्षावंद्य मानून राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत.
उद्योगनगरीत संत तुकोबांच्या पालखीचे स्वागत
संत तुकाराम महाराज यांची पालखीचे उद्योगनगरीचे प्रवेशद्वार असलेल्या भक्तीशक्ती चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी पिंपरी चिंचवड शहरातील वारकऱ्यांनी तुकोबांच्या पालखीला टाळ, मृदंगाच्या नादात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत मोठ्या नामघोषात स्वागत करण्यात आले. या वेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील व प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय, सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने वारीतील वारकऱ्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले.