सांगवी, (वार्ताहर) – जोपर्यंत उन्हाचे चटके जाणवत नाहीत; तोपर्यंत थंड पेयांच्या दुकानांकडे ग्राहक वळत नाहीत, असे चित्र असते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून अचानक तापमानात वाढ झाली असल्यामुळे नागरिकांची पावले थंड शीतपेय व रसवंती गृहाकडे वळू लागली आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने शीतपेये आणि रसवंतीगृह चालकांना थोड्याफार प्रमाणात अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याच्या बाजूला रसवंतीगृहाच्या घुंगरांचा आवाज ऐकू येत आहे. जणू रस्त्यावरून ये-जा करणार्यांना तो आवाज साद घालत आहे. सर्वजण कुटुंबासह लिंबू व घातलेल्या उसाच्या रसाचा मनसोक्त आस्वाद घेतानाचे चित्र सांगवी परिसरात दिसून येत आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणार्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये, रसवंतीगृहे दिलासादायक वाटत असल्यामुळे या शीतपेयांना व रसवंतीगृहामध्ये ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आइस्क्रीम, बर्फगोळा, कुल्फी, फळे, सॅलड, भेळपुरी, पाणीपुरी, चाट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळे व खाद्य पदार्थांची दुकाने थाटली आहेत.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा व तहान भागविण्यासाठी सरबत, उसाचा रस, आइस्क्रीम, कुल्फी, लिंबू-सरबत यांसारख्या थंड पदार्थांची दुकाने थाटलेली दिसत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिक उसाचा रस पिण्याला जास्त प्राधान्य देतात. अन्य शीतपेयांच्या तुलनेत उसाचा रस स्वस्त व मस्त असल्याने त्याला अधिक मागणी दिसून येते.
लहानग्यांचा आइस्क्रीमकडे ओढा
लहान मुलांना आइस्क्रीम पसंत असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी नागरिक परिवारासोबत जाऊन आइस्क्रीमचा आनंद घेताना दिसून येत आहेत. बर्फाचा गोळाही आकर्षित करीत आहे. साधा गोळा, मावा गोळा, आइस प्लेट यांसारखे प्रकार यात उपलब्ध आहेत. आइस्क्रीम पार्लरची संख्या वाढली असली तरीही बर्फगोळ्याचे महत्त्व अद्याप टिकून आहे.
थंडगार लिंबूसरबत
लिंबू सरबत पिण्यालाही लोक पसंती देत आहेत. अनेक ठिकाणी मठ्ठा व जलजिराच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. साधारणपणे 10 ते 20 रुपये ग्लास मिळणारा हा जलजिरा सर्वांनाच आवडतो. महाविद्यालय, शाळा, मंगल कार्यालय या भागांमध्ये या गाड्या दिसत आहेत.
ज्यूसला मागणी
परिसरात ज्यूसची बारमाही दुकाने दिसतात. विविध प्रकारचे सरबत याठिकाणी उपलब्ध आहेत. चॉकलेट शेक, कोल्ड कॉफी, लिंबू सरबत, रोझ मिल्कशेक, तसेच अननस, स्ट्रॉबेरी, चिकू, सफरचंद, संत्री, कलिंगड या फळांच्या ज्यूसची मागणी वाढली आहे. हे सर्व प्रकारचे ज्यूस साधारणपणे 10 ते 60 रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत.