सोलापूर – महाराष्ट्राची ग्रामदैवत असणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात (Tulja Bhavani Temple) धाराशिवचे माजी पालकमंत्री तथा माजी कॅबिनेट मंत्री रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
आज बुधवारी सकाळी ही घटना समोर आली आहे. दर्शनासाठी महादेव जानकर मंदिरात गेले असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. सुरक्षारक्षकांनी त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले. त्यामुळे जानकर यांना मंदिरात तुळजाभवानीचे दर्शन न घेताच परतावे लागले.
या घटनेनंतर महादेव जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधत यंत्रणेवर संताप व्यक्त केला. जानकर म्हणाले की, “प्रशासनाने जनेतचे सेवक कोण आहेत हे तपासावे. आम्ही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यभर, देशभर फिरत असतो. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत. योग्य पद्धतीने मान सन्मान राखला पाहिजे. सत्ता येते आणि जाते हे त्यांनी लक्षात ठेवावे,” असा इशारा यावेळी जानकर यांनी दिला.
जानकर पुढे बोलताना म्हणाले “ज्यांनी सुरक्षा यंत्रणेचा ठेका घेतला आहे त्या बीव्हीजी कंपनीचे मालक माझ्या गावचे अर्थात सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे आहेत. त्यांच्याशी मी पुढच्या दहा मिनीटांत चर्चा करणार आहे. आम्ही देखील याच राज्याचे असून ती आमची देखील देवी आहे,” असे जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. दरम्यान, यापूर्वी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना देखील तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्याही वेळी या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती.