न्यूयॉर्क : जगातील सर्वात पुढारलेला देश अमेरिका असो किंवा या देशातील सर्वात प्रगत शहर न्यूयॉर्क असो या ठिकाणी सुद्धा शहराला उंदीर आणि घुशींचा त्रास जाणवत आहे. यामुळेच या महानगराला उंदीर आणि घुशीच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी न्यूयॉर्क महापालिकेने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्याला दरवर्षी एक कोटी 20 लाख रुपये पगार देण्यात येणार आहे.
कॅथरीन कोराडी असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. 900 पेक्षा जास्त उमेदवारांमधून या महिलेला नियुक्त करण्यात आल्याची घोषणा मेयर एरीक ॲडम्स यांनी केली. कॅथरीन कोराडी ही एक माजी शिक्षिका असून तिलाही उंदीर आणि घुशी या प्राण्यांचा तिरस्कार आहे. याच भावनेतून तिने हे पद स्वीकारले असून वर्षभराच्या कालावधीमध्ये न्यूयॉर्क शहराला उंदीर आणि घुशीपासून आपण मुक्त करणार असल्याचा दावा तिने केला आहे.
यापूर्वी अमेरिकेच्या शिक्षण खात्यात याच प्रकारचे काम करणाऱ्या कॅथरीनने आगामी कालावधीमध्ये उंदीर आणि घुशींना कोणत्या प्रकारचे अन्न उपलब्ध होणार नाही अशी दक्षता घेतली जाईल. त्या प्रकारचे नियोजनही केले जाईल असे म्हटले आहे. शहरातील घराघरात निर्माण होणारे शिळे अन्न आणि खरकटे या जीवावरच उंदीर आणि घुशी पोसल्या जात आहे. या शिळ्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून पहिली पावले उचलण्याचे संकेत कॅथरीन कोराडी यांनी दिले आहेत.