नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताप आला असून घशात खवखवत आहे. त्यामुळे काल (7 जून) दुपारपासून त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अरविंद केजरीवाल यांनी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन करुन घेतले असून त्यांची उद्या (9 जून) करोना चाचणी होणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य संजय सिंह यांनी केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.
अरविंद केजरीवाल यांनी काल (7 जून) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिल्ली सरकारच्या अखत्यारितील सर्व सरकारी रुग्णालयं आणि खासगी रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीच्या नागरिकांवर उपचार होतील, तर केंद्र सरकारच्या अखत्यारितील शासकीय रुग्णालयांमध्ये देशाच्या इतर भागातून आलेल्या नागरिकांवर उपचार होतील, अशी घोषणा केली होती.
अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. सोमवारपासून म्हणजेच आजपासून उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांलगतच्या सीमा खुल्या केल्या जातील, अशीदेखील घोषणा त्यांनी केली होती.