आर्टिफिशियल इंटेलिजन्स : गरज धोरणाची आणि कायद्याची (भाग-१)

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्‍चात्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. या तंत्रज्ञानाचे जसे काही सकारात्मक परिणाम आहेत, तसेच नकारात्मक परिणामही आहेत. मात्र, आगामी काळात या तंत्रज्ञानाचा वापर वाढतच जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी एक प्रभावी धोरण आणि कायदा तयार होणे गरजेचे आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात केरळ पोलिसांनी दैनंदिन कामकाजासाठी यंत्रमानवाचा वापर सुरू केला. त्याच महिन्यात चेन्नईमध्ये एक रेस्टॉरंट सुरू झाले. त्यातील वेटर रोबो असून, ते केवळ ग्राहकांना सेवाच देतात असे नाही तर त्यांच्याशी इंग्रजीतून आणि तमिळ भाषेतून गप्पाही मारतात. तत्पूर्वी डिसेंबर 2018 मध्ये एका हृदयरोग तज्ज्ञाने सुमारे 32 किलोमीटर दूर असणाऱ्या रुग्णावर “इन-ह्यूमन टेलीरोबोटिक कोरोनरी इंटर्व्हेन्शन’ नावाचा उपचार केला होता. थोडक्‍यात सांगायचे झाले तर दूरच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यस्थळी यंत्रमानवाची उपस्थिती भविष्यातील एका विशिष्ट कार्यसंस्कृतीचे संकेत देत आहे. ही कार्यसंस्कृती म्हणजे अर्थातच आर्टिफिशियल इन्टेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता होय.

आपल्या दैनंदिन जीवनाचा दरवाजा आर्टिफिशियल इन्टेलिजन्सने ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर आपले कामही सुरू केले आहे. त्याचबरोबर वर दिलेल्या उदाहरणांमधून असे दिसून येते की, आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचे काही फायदे निश्‍चित आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्याला या तंत्रज्ञानाचे काही तोटेही झेलावे लागणार आहेत. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एकतरी नकारात्मक पैलू असतोच. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स प्रणालीत स्वतःहून अनुभवातून शिकण्याची आणि नंतर त्यानुरूप कामे करण्याची क्षमता असते, हे उल्लेखनीय आहे. या क्षमतेमुळेच आर्टिफिशियल इन्टेलिजन्स ही प्रणाली 21 व्या शतकातील सर्वाधिक विनाशकारी आणि सेल्फ ट्रान्स्फॉर्मेटिव्ह म्हणजेच आत्मपरिवर्तनशील प्रणाली ठरण्याची चिन्हे आहेत. थोडक्‍यात सांगायचे झाल्यास, जर आर्टिफिशियल इन्टेलिजन्स या तंत्रज्ञानाचे नियमन योग्य प्रकारे केले गेले नाही तर त्याच्या चांगल्या परिणामांबरोबरच अनेक वाईट परिणामही होऊ शकतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स : गरज धोरणाची आणि कायद्याची (भाग-२)

अशी कल्पना करा की, आपल्या प्रिय व्यक्तीवर एखादी शस्त्रक्रिया यंत्रमानव करीत आहे आणि अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला. आपल्या देशात अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये ही समस्या आहेच. डॉक्‍टरांशी असलेला यंत्रमानवाचा संपर्क यामुळे तुटला, तर काय होईल, असा विचार करून पाहा. त्याचप्रमाणे एखादे ड्रोन एखाद्या माणसाला धडकले तर काय होईल, याचाही विचार करून पाहा. या तंत्रज्ञानावर अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न जगभरात उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आज ना उद्या हे प्रश्‍न भारतातही उपस्थित केले जाणारच आहेत. हे प्रश्‍न विचारले जाणे स्वाभाविक आणि आवश्‍यक अशासाठी आहे की, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स या तंत्रज्ञानाबरोबर अनेक आव्हाने आपल्याकडे वाटचाल करीत आहेत.

– अॅड. प्रदीप उमाप

Leave A Reply

Your email address will not be published.