नवी दिल्ली – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा नवोदित क्रिकेटपटू अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा फलंदाज असीफ अलीचा मोक्याच्या क्षणी झेल सोडला. त्यावरून काही व्यक्तींनी सोशल मीडियावर अर्शदीपबाबत आक्षेपार्ह विधान केले. यावरून देशातील वातावरण बिघडवण्यात मदत करु नका, असे ताशेरे ओढत केंद्र सरकारने विकिपीडीयाला नोटीस पाठवली आहे.
या स्पर्धेत रविवारी भारत व पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या लढतीत अर्शदीपने असीफ अलीचा झेल सोडला. यावरून सध्या त्याच्यावर प्रचंड टीकाही सुरु आहे. मात्र, टीका करताना चाहत्यांना भान राहिले नाही व त्यांनी अर्शदीपला एका गटाचा सदस्य असून त्याला भारतीय संघातून काढा अशी मागणी करणारी पोस्ट व्हायरल केली होती. ज्या गटाचा या पोस्टमध्ये उल्लेख आहे त्यांच्यावर भारतात बंदी लावली गेली आहे. त्यामुळे त्याच्या पेजवर या गटाची लिंक कशी दिली गेली अशी विचारणाही केंद्र सरकारने विकिपीडियाला केली आहे.
यानंतर विकिपीडियावरील अर्शदीपच्या पेजवर काही माहिती कशी बदलली गेली अशी विचारणा करत केंद्र सरकारच्या आयटी विभागाने ही नोटीस जारी केली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यावर विकीपीडिया पेजवर अर्शदीपबाबत आक्षेपार्ह विधान केले गेले. या पोस्टची लिंक भारतात कशी प्रसारीत झाली. असे घडत असेल तर येत्या काळात केवळ अर्शदीपलाच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच देशातील वातावरणी बिघडू शकते व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, असे केंद्र सरकारच्या सुत्रांनी म्हटले आहे.
काय घडले होते
पाकिस्तानच्या डावाच्या 17 व्या षटकात अर्शदीपने पाकिस्तानचा फलंदाज असीफ अलीचा झेल सोडला होता. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यावर काही क्षणातच सोशल मीडियावर त्याच्यावर टीका सुरु झाली. त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात येत आहे. त्यावेळी हा झेल घेतला गेला असता तर भारतीय संघाचा विजय झाला असता अशी प्रतिक्रीया व्यक्त होत असतानाच अत्यंत आक्षेपार्ह विधानेही करण्यात आली आहेत. त्यावरूनच आता केंद्र सरकार आक्रमक बनले आहे. आता विकिपिडीयाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.