World Cup 2023 : मुंबई की कोलकाता? टीम इंडिया कुठे खेळणार Semifinal ? पाकिस्तानमुळे निश्चित होत नाहीय ठिकाण; नेमकं काय आहे प्रकरण…

World Cup 2023 Semifinal Venue : विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत तीन उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. यजमान भारत पहिला उपांत्य फेरीचा खेळाडू ठरला. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि त्यानुसार, टीम इंडिया मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 15 नोव्हेंबर रोजी चौथ्या क्रमांकावरील संघासोबत पहिला उपांत्य सामना खेळेल. मात्र पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आल्यास भारताच्या उपांत्य फेरीचे ठिकाण बदलले जाईल. हे का घडेल ते जाणून घेऊया….
जर न्यूझीलंड किंवा अफगाणिस्तान चौथ्या स्थानावर आले तर भारतीय संघ उपांत्य फेरीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळेल. दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. पण जेव्हा पाकिस्तान चौथ्या स्थानावर येईल आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल तेव्हा हे प्रकरण उलटे होईल.
उपांत्य फेरीच्या ठिकाणाबाबतची ही अनिश्चितता आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विनंतीवरून स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच केली होती. पाकिस्तान संघाचे कोणतेही सामने मुंबई शहरात खेळवले जाऊ नयेत, अशी विनंती पीसीबीकडून करण्यात आली होती आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे केले गेले, त्यामुळे जर पाकिस्तान चौथा उपांत्य फेरीचा संघ ठरला तर उपांत्य फेरीच्या मैदानाचे ठिकाणात बदल केले जातील.
टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असून उपांत्य फेरीत त्यांचा सामना चौथ्या क्रमांकाच्या संघाशी होणार आहे. पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आल्याने टीम इंडियाचे सेमीफायनलचे ठिकाण कोलकात्यात ईडन गार्डन होईल आणि त्यानंतर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सेमीफायनल मुंबईतील वानखेडेवर हलवला जाईल.
उपांत्य फेरीसाठी तीन संघांमध्ये लढत सुरू…
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू आहे. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंड प्रबळ दावेदार आहे. तिन्ही संघांचे 8-8 गुण आहेत आणि तिन्ही संघांचे 1-1 सामने बाकी आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंड संघ बेंगळुरू येथे श्रीलंकेविरुद्ध खेळत आहे.





