महेश जाधव
मायणी – ब्रिटीश राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 143 वर्षापूर्वी माणगंगा नदीवर बांधलेल्याला देवापूरच्या तलावात फ्लेमिंगो (रोहित, अग्निपंख) या परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावण्याचा पहिला मान “माण’ तालुक्यातील देवापूर तलावाला दिला आहे. तर खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी, येरळवाडी व मायणी तलाव फ्लेमिंगोच्या प्रतीक्षेत आहेत.
खटाव- माणमधील नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये थंडीच्या दिवसात छोट्या- मोठ्या पाणवठ्यावर पाणथळी पक्षी हजेरी लावतात. माण तालुक्यातील पिंगळी व देवापूर तलावात फ्लेमिंगो पक्षांनी अनेक वेळा हजेरी लावली आहे. तर खटाव तालुक्यातील मायणी, येरळवाडी व सर्यूाचीवाडी या तलावांत परदेशी पाहुणे पक्षी कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावतात.
सध्या माणची दुष्काळी परिस्थिती असल्याने तलावात पुरेसा पाणीसाठा नाही. मात्र, फ्लेमिंगोसाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हा तलाव फायद्याचा ठरत आहे. लांब गुलाबी पाय, केळीसारखी गुलाबी- काळी चोच,इंग्रजीतील एस आकारासारखी मान असे दिसणारे 45 फ्लेमिंगो दलदलीच्या भागातील मासे, शैवाल व छोटे कीटक शोधताना देवापूर तलावात दिसत आहेत.
खटाव माणच्या सौदर्यात भर..
खटाव- माणमधील पिंगळी, देवापूर, कानकात्रे, सूर्याचीवाडी व येरळवाडीतील तलावात कमी जास्त प्रमाणात फ्लेमिंगो दाखल होतात. कमी पाण्यातील शैवाल व कवचधारी कृमी कीटक खाण्यासाठी हे पक्षी तलावातील दलदलीच्या भागात दिसत आहेत. यामुळे खटाव- माणच्या सौदर्यात भर पडली आहे. पक्षी अभ्यासकांना पर्वणी ठरु लागली आहे.
अंकुश चव्हाण, पक्षीमित्र, मायणी