पिंपरी – दिवाळीची सुट्टी आता संपत आली आहे, परंतु काही खासगी शाळांनी मुलांना दिलेला गृहपाठ विद्यार्थ्यांची आणि पालकांची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. विशेषतः प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दिलेला गृहपाठ मुलांसोबत पालकांनाही रडकुंडीला आणत आहे.
दिवाळीची दीर्घकालीन सुट्टी म्हटल्यावर मुलांमध्ये मोठा आनंद असतो. सुट्टीचा आनंद लुटण्याची त्यांची तयारी असते, परंतु या मोठ्या सुट्टीच्या काळात अभ्यासापासून विद्यार्थी एकदमच अलिप्त राहू नयेत, या उद्देशाने दिवाळीचा गृहपाठ देण्याची प्रथा सुरू झाली. हळू-हळू हा गृहपाठ इतका वाढू लागला की त्यापेक्षा सुट्टी नको असे म्हणण्याची वेळ आली. मध्यतंरी दिवाळीच्या गृहपाठावर निर्बंधही घालण्यात आले होते. परंतु पुन्हा गृहपाठ सुरू झाला. प्रत्येक विषयाचा शिक्षक आपल्या विषयात विद्यार्थ्यांनी घरात बसून पारंगत व्हावे, या करिता दिवाळीच्या सुट्टीचा वापर करताना दिसतात. जास्तीत-जास्त गृहपाठ देत तो पूर्ण करुन आणण्याचा आग्रह धरला जातो.
पालकांच्या मोबाइलवर गृहपाठ
पालकांच्या मोबाइल नंबरवरच शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीत काय-काय अभ्यास करायचा आहे, त्याची यादी पाठवून दिली आहे. काही शाळांची विशेषतः प्राथमिकच्या विद्यार्थ्यांची यादी इतकी लांबलचक आहे, की पालकांनाच विद्यार्थ्यांसोबत तासन तास बसून गृहपाठ पूर्ण करुन घ्यावा लागत आहे. दिवाळीचे तीन-चार दिवस गृहपाठ करुन घेणे शक्य नसल्याने दिवाळी संपल्यानंतर अनेकांना आता आपल्या मुलांसोबत दिवसभर बसून अभ्यास पूर्ण करुन घ्यावा लागत आहे.
शनिवार-रविवार गेला खरडपट्टीत
दिवाळीनंतर कार्यालये सुरू झाली आणि पालक कामाला जाऊ लागले. अनेक घरांमध्ये दिवाळीनंतरच्या शनिवारी-रविवारी बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु शाळांनी दिलेला होमवर्क काही केल्या पूर्ण होत नसल्याने अनेकांना घरात बसून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मुलांकडून गृहपाठ करुन घेण्यात वेळ घालवावा लागला. बहुतेक शाळांनी गृहपाठासाठी वेगळ्या वह्या करण्यास सांगितले आहेत. पहिली-दुसरीच्या मुलांनाही वही भरेल एवढा गृहपाठ देत शाळांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही चांगलीच शाळा घेतली.