पुणे – नाना पेठ भागात वाहनांचे सुट्टे भाग विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला धमकावून 12 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकास अटक करण्यात आली.
आयनुल अन्वर खान (वय 26, रा. सत्तारखान चाळ, नाना पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत दुकानातील कामगाराने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नाना पेठ भागात वाहनांचे सुट्टे भाग विक्री करणाऱ्या दुकानात तक्रारदार कामाला आहे.
दोन दिवसांपूर्वी खान दुकानात आला. त्याने दुकान मालकाला 12 हजार रुपयांची खंडणी मागितली. मालकाने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर दुकानातील कामगाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या हातातील 4 हजारांची रोकड हिसकावून खान पसार झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पसार झालेल्या खानला पोलिसांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक आर. इ. आळेकर तपास करत आहेत.