बगदाद – इराणच्या लष्कराचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येप्रकरणी इराकमधील न्यायालयाने अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये सुलेमानी यांच्यासह इराकचे वरिष्ठ लष्करी अधिकारी अबू महदी अल-मुहंदिस देखील मारले गेले होते.
इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात हे दोन्ही अधिकारी मारले गेले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बगदादमधील न्यायालयाने ट्रम्प यांच्याविरोधात हे वॉरंट बजावले आहे.
अल-मुहंदिस हे पॉपुलर मोबिलायझेशन फोर्स या सरकारी सुरक्षा संस्थेचे उपनेते होते. पॉपुलर मोबिलायझेशन फोर्स ही इराणचे समर्थन असलेल्या लष्करी गटांची पालक संघटना आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा मुकाबला करण्यासाठी ही लष्करी संघटना स्थापन झाली होती.
सुलेमानी आणि मुहंदिस या दोघांची हत्या पूर्वनियोजनाने करण्यात आली असल्याचा आरोप असून या प्रकरणातील दोषींना देहदंडाची शिक्षा देणे अपेक्षित आहे. अर्थात ही शिक्षा प्रत्यक्षात दिली जाणे शक्य नसले तरी प्रतिकात्मक रित्या त्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाऊ शकते.