- शहरातील मशिदींबाहेर चोख पोलीस बंदोबस्त
पिंपरी – भोंग्यावरून बांग दिली जाते त्याठिकाणी भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे आज (बुधवार) शहर मनसेचे पदाधिकारी मशिदीबाहेर भोंग्यावरून हनुमान चालीसा लावण्यापुर्वीच शहरात सकाळपासूनच सुमारे 20 ते 25 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील सर्वच मशिदीबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले होते.
पिंपरी-चिंचवड शहरात आज (बुधवार) भोंग्यावरुन हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यापुर्वीच पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांना त्यांच्या घराबाहेर अटक केली आहे. याबरोबरच विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपाध्यक्ष बाळा दानवले, अंकुश तापकीर, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष सुशांत साळवी, महिला नेत्या सीमा बेलापूरकर, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, रूपेश पटेकर, राजू सावळे, दत्ता देवतरासे, नितिन चव्हाण, विशाल मानकरी, विद्यार्थी सेनेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक शिंदे, रोहिदास शिवणेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांनी मंगळवार (दि. 3) शहरातील मनसेच्या 267 पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या होत्या